वन विभागाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात
गुरवली येथील माहिती फलक गायब; सुरक्षेचा पुरता बोजवारा
टिटवाळा, ता. १० (वार्ताहर) : गुरवली फाटक परिसरात सुरू असलेल्या फॉरेस्ट विभागाच्या ''ऑफिस क्वार्टर्स''च्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप होत आहे. बांधकामस्थळी अनिवार्य असलेला माहिती फलक नसल्याने प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सुरक्षेच्या अभावामुळे स्थानिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
नियमानुसार कोणत्याही शासकीय बांधकामाच्या ठिकाणी कंत्राटदाराचे नाव, कामाची मुदत आणि मंजुरीचे तपशील देणारा फलक असणे बंधनकारक आहे; मात्र येथे असा कोणताही फलक नसल्याने हे काम कोणाच्या देखरेखीखाली सुरू आहे, याबाबत संभ्रम आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते गोविंद प्रजापती यांनी स्थळाची पाहणी केली असता, स्थानिक वनपालाकडे कोणतीही अधिकृत माहिती किंवा ''वर्क ऑर्डर'' उपलब्ध नसल्याचे समोर आले. तसेच वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. परिसरातील वस्तीत राहणारी लहान मुले येथे खेळायला येतात. त्यामुळे उघडे खड्डे आणि विखुरलेले बांधकाम साहित्य यांभोवती कोणतेही बॅरिकेटिंग किंवा संरक्षक कुंपण नसल्याने अपघाताची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे, वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ‘माहिती देतो’ अशा पोकळ आश्वासनांपलीकडे कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही.
पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती यांनी याप्रकरणी माहिती अधिकारांतर्गत कागदपत्रांची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने पारदर्शकता न पाळल्यास कंत्राटदाराविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.