निवृत्त पोलिस अधिकाऱ्याकडून युवतीला मारहाण
कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीतील घटना
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील एका नामांकित सोसायटीत निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने एका युवतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बी. एल. पवार असे या संशयित आरोपीचे नाव असून, त्यांच्या वाढत्या दहशतीविरोधात सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येत महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पीडित युवती आपल्या कुटुंबीयांसोबत सोसायटीच्या मैदानात बसलेली असताना ही घटना घडली. आरोपी बी. एल. पवार यांनी आपली स्कूटी कथितरीत्या युवतीच्या पायावर चढवली. यावरून जाब विचारला असता, त्यांनी पीडितेशी हुज्जत घालत तिला मारहाण व शिवीगाळ केली. या वेळी वाचवण्यासाठी आलेल्या इतर रहिवाशांनाही आरोपीने पोलिस असल्याचा रुबाब दाखवत धमकावल्याचा आरोप आहे.
पीडित युवतीच्या तक्रारीवरून संबंधित निवृत्त अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, साक्षीदारांचे जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बलिराम सिंह परदेशी यांनी दिली.
रहिवाशांचा तक्रारींचा पाढा
पवार हे नेहमीच सोसायटीतील मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी उद्धटपणे वागतात आणि स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगून दहशत निर्माण करतात, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
या घटनेमुळे संतापलेल्या रहिवाशांनी मोठ्या संख्येने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.