व्हॉट्सअॅप मेसेजचा वाद विकोपाला
अंबरनाथमध्ये सोसायटी सदस्यावर हल्ला
अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) : सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुरक्षेबाबत टाकलेला एक साधा मेसेज अंबरनाथमध्ये जीवावर बेतला आहे. किरकोळ वादातून माजी पदाधिकाऱ्यांनी एका सदस्यावर स्क्रू ड्रायव्हर आणि खुर्चीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत ४२ वर्षीय प्रमोद विश्वकर्मा गंभीर जखमी झाले असून, या धक्क्याने त्यांच्या गर्भवती पत्नीचा गर्भपात झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
१ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अंबरनाथ पूर्व येथील पार्श्वहिल सोसायटीत हा प्रकार घडला. "अनोळखी व्यक्तींना थेट घरात प्रवेश देऊ नये," असा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मेसेज विश्वकर्मा यांनी ग्रुपवर टाकला होता. या मेसेजचा राग मनात धरून काही माजी पदाधिकाऱ्यांनी विश्वकर्मा यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवले. तसेच स्क्रू ड्रायव्हर आणि प्लॅस्टिक खुर्चीने त्यांच्या डोक्यावर गंभीर वार केले. हल्ल्याच्या वेळी विश्वकर्मा यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व प्रकारात बसलेल्या मानसिक आणि शारीरिक धक्क्यामुळे त्यांचा गर्भपात झाल्याचे पीडित विश्वकर्मा यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
पाच जणांवर गुन्हा दाखल
घटनेनंतर जखमी प्रमोद यांनी तत्काळ ''११२'' वर कॉल करून पोलिसांना कळवले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विशाल भालिद, आनंद बामणीकर, हर्ष बामणीकर, दिनेश दुगुर्डे, बाबूराव दुगुर्डे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सोसायटीत भीतीचे वातावरण
भ्याड हल्ल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.