तस्करीचे धागेदोरे थेट पंजाबपर्यंत
सूत्रधार हरजीत सिंगला बाबा बकाला येथून अटक
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : पंजाबमधून महाराष्ट्रात होणाऱ्या ड्रग्ज आणि बेकायदा शस्त्रास्त्र तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार हरजीत सिंग हिम्मत सिंग याला अमली पदार्थविरोधी कक्षाने पंजाबमधील ‘बाबा बकाला’ परिसरातून अटक केली आहे. या कारवाईमुळे तस्करीच्या या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे आता थेट पंजाबच्या सीमेपर्यंत पोहोचले आहेत.
अमली पदार्थविरोधी पथकाने १५ मार्चला नाशिक-पुणे महामार्गावर पाठलाग करून ४१ लाखांचे हेरॉईन आणि ऑस्ट्रिया बनावटीचे १०.५ लाख रुपये किमतीचे महागडे ‘ग्लॉक पिस्तूल’ जप्त केले होते. या प्रकरणाच्या सखोल तांत्रिक तपासात विक्रोळीचा दीपक सिंग खैनाल याचे नाव समोर आले होते; मात्र दीपक सिंगला या तस्करीसाठी माल पुरवणारा आणि संपूर्ण रॅकेटची सूत्रे हलवणारा मुख्य आरोपी हरजीत सिंग हा पंजाबमध्ये बसून हालचाली करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हरजीत सिंगचा माग काढला. पंजाबमधील बाबा बकाला येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. हरजीत सिंग हा पंजाबमधून नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ आणि घातक शस्त्रांची रसद पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या हरजीत सिंगला नवी मुंबईत आणण्यात आले असून, शुक्रवारी (ता. १०) पहाटे ३ वाजता त्याला सुरक्षिततेच्या कारणास्तव तळोजा पोलिस ठाण्यातील तुरुंगात कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.
हरजीत सिंग हा या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा आहे. त्याच्या अटकेमुळे पंजाबमधून महाराष्ट्रात शस्त्रास्त्रे आणि ड्रग्ज कोण पुरवत होते आणि यामागे आणखी कोणते मोठे गट सक्रिय आहेत, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
- संदीप निगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.