गोळीबाराचा रोख चुकला
ऐरोली गोळीबार प्रकरणात ‘बिल्डर’ मुख्य टार्गेट
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) ः ऐरोली सेक्टर १ मध्ये सोमवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबार प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेला आरटीआय कार्यकर्ता अमित मौर्य हा मुख्य टार्गेट नसून, हल्लेखोराचा खरा रोख त्याचा मित्र आणि बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) संदीप गवस याच्यावर होता, असे प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भिवंडीतील १० एकर जमिनीच्या आर्थिक वादातून हा कट रचला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
सोमवारी ६ एप्रिलला रात्री ११:५० च्या सुमारास अमित मौर्य आणि संदीप गवस हे दोघे गप्पा मारत उभे असताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला होता. यावेळी अमित मौर्य हा स्वतःचा बचाव करण्यासाठी खाली वाकला असताना एक गोळी अमित मौर्य यांच्या मानेला आणि कानाला लागून आरपार गेली. यामध्ये मौर्य हा गंभीर जखमी झाला. तर संदीप गवस सुदैवाने बचावला. हल्लेखोराचा रोख संदीप गवस याच्या दिशेने असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
रबाळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराचा माग काढला असता, त्याने वापरलेली मोटारसायकल मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेर बेवारस स्थितीत सापडली. अधिक तपासात ती दुचाकी ''चोरीची'' असल्याचे निष्पन्न झाले आहे. हल्लेखोराने आपली ओळख लपवण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरीच्या वाहनाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे गाडीच्या मालकावरून आरोपीपर्यंत पोहोचण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना सध्या तरी खीळ बसली आहे.
संदीप गवस हा बांधकाम व्यवसायात असून, भिवंडी येथील १० एकर जमिनीच्या व्यवहारावरून त्याचा काही व्यक्तींशी आर्थिक वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच वादातून गवस याची ''सुपारी'' देण्यात आली होती का? या दिशेने आता रबाळे पोलीस आणि नवी मुंबई गुन्हे शाखेची पथके तपास करत आहेत.