बसचालकला बेदम मारहाण
भाईंदर, ता. १० (बातमीदार) : दुचाकीस्वार व मिरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेतील बसचालक यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान सात ते आठ जणांच्या टोळक्याने बसचालकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात झाली. याप्रकरणी ठाणे येथील कोपरी पोलिस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बसचालकाला झालेली मारहाण बसमधील सीसीटीव्हीत चित्रित झाली असून, बसचालकावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
महापालिका परिवहन सेवेची भाईंदर ते ठाणे डेपो या मार्गावर धावणारी बस गुरुवारी (ता.९) दुपारी ठाण्याच्या दिशेने जात असताना गायमुखच्या पुढे सेवा रस्त्यावर एक दुचाकीस्वार व बसचालक शंकर चव्हाण यांच्यात वाद झाला. चव्हाण यांनी दुचाकीस्वाराला समजावण्याचा प्रयत्न केला व माफीदेखील मागितली. मात्र, दुचाकीस्वार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने बसचा पाठलाग केला.
बस कोपरी बस स्थानकात पोहोचल्यानंतर बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले. त्याचवेळी दुचाकीस्वार आणि त्याच्यासोबत सहा ते सात जण बसमध्ये शिरले व त्यांनी चालक चव्हाण यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर सर्वांनी चव्हाण यांना बसमधून उचलून खाली नेले व त्याठिकाणीदेखील लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या वेळी बसच्या वाहकालाही मारहाण करण्यात आली.
ही मारहाण एवढी भीषण स्वरूपाची होती की चालक शंकर चव्हाण बेशुद्ध झाले. त्याच वेळी पोलिस आल्याने सर्व जण पळून गेले. ही संपूर्ण घटना बसमध्ये अससेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. गंभीर जखमी झालेल्या शंकर चव्हाण यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी दुचाकीस्वार नीलेश गणेश शिंदे याच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शिंदे याने त्याआधी चालक शंकर चव्हाण व वाहक यांच्या विरोधात कसार वडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.