बल्करच्या धडकेत
दुचाकीस्वाराचा मृत्यू
पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : कळंबोली परिसरात भरधाव बल्करच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) घडली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळंबोली पोलिसांनी बल्करचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
कमलेश सूरज यादव (२६) याचा या अपघातात मृत्यू झाला तर शैलेश सहानी (२२) हा जखमी झाला आहे. हे दोघेही कळंबोलीत राहण्यास असून शुक्रवारी (ता. १०) दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास कळंबोली सर्कल येथील ए.आर.के. टायरसमोरून सिमेंट कंपनीच्या मुख्य रस्त्यावरून प्रवास करीत होते. याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या बल्करचालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक कमलेश गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला शैलेशदेखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात बल्करचालक लवकुश जयस्वाल (३४) याच्याविरोधात मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.