मेट्रोच्या पार्किंगसाठी जागा द्यावी!
प्रताप सरनाईक यांचे नरेंद्र मेहतांना आवाहन
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : मिरा-भाईंदर मेट्रोचा काशीगाव ते दहिसर हा टप्पा नुकताच सुरू झाला आहे. मेट्रोला प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे; मात्र त्यासोबतच काशीगाव मेट्रो स्थानकाजवळ पार्किंगची सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या स्थानकालगतच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची जमीन आहे. त्यामुळे वाहनांचे पार्किंग करण्यासाठी मेहता यांनी आपली जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.
काशीगाव मेट्रो स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, अपूर्ण एन्ट्री-एक्झिट पॉइंट्स आणि पार्किंगच्या समस्येची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी (ता. ११) काशीगाव मेट्रो स्थानक परिसराची पाहणी केली. तांत्रिक अडचणी आणि काही जागा मालकांच्या आडकाठीमुळे स्थानकाच्या चारपैकी दोन एन्ट्री-एक्झिट पॉइंट्सचे काम प्रलंबित राहिले असल्याचे या वेळी निदर्शनास आले.
काशीगाव मेट्रो स्थानकालगत ओसवाल बिल्डरच्या जमिनीच्या वादामुळे काम थांबले आहे. हे काम पोलिस बंदोबस्तात तातडीने सुरू करण्याचे आदेश सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आमदार नरेंद्र मेहता यांच्या ७/११ कंपनीच्या मालकी जागेवरील १३३ मीटर जागा मेट्रोच्या एन्ट्री-एक्झिट पॉइंट्ससाठी उपलब्ध झाली आहे; मात्र शहराच्या हितासाठी त्यांनी केवळ १३३ मीटर जागा न देता तो संपूर्ण भूखंडच ‘पार्किंग प्लाझा’साठी एमएमआरडीएला हस्तांतरित करावा. ७/११ कंपनीने हा भूखंड दिला, तर त्या ठिकाणी सुमारे १,५०० ते २,००० खासगी वाहनांची सोय होईल, असा प्रशस्त पार्किंग प्लाझा उभारता येईल. सामान्यांच्या सोयीसाठी मेहता यांनी आपला भूखंड एमएमआरडीएला द्यावा. त्यांनी त्यासाठी हवे तर चालू बाजारभावाने मोबदला घ्यावा; पण त्याठिकाणी भव्य पार्किंग प्लाझा उभारून शहर कोंडीमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सरनाईक यांनी मेहता यांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.