नगरसेवकांना असमान निधीवाटप
मुंबईच्या विकासाचा समतोल बिघडण्याची भीती
विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः मुंबई महापालिकेमधील असमान निधीवाटप हा फक्त तात्पुरता प्रशासकीय प्रश्न नसून, त्याचा शहराच्या विकासावर दीर्घकालीन परिणाम होणार आहे. असमतोल निधीवाटप शहराच्या विकासाचा समतोल बिघडविणारा असून, नागरिकांच्या जीवनमानावरही त्याचा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. निधीवाटपाबाबत धोरण ठरवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना स्थायी समिती अध्यक्ष गटनेत्यांच्या बैठकीत निधीवाटप ठरवायचे. पालिका आयुक्तांना गटनेत्यांच्या बैठकीत बोलावून नगरसेवकांची पत्रं विकास निधीसाठी आल्याचे गटनेते सांगायचे. या निधीला पालिका सभागृहाची मंजुरी मिळायची. दरम्यान, सामोपचाराने निधीवाटप व्हायचे. या वेळी निधी वाटपात असमानता झाल्याने विरोधी पक्षाचे नगरसेवक कमालीचे नाराज आहेत.
स्थायी समितीत यंदाच्या अर्थसंकल्पात फेरफार करीत ८०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. २२७ नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी, महापौर निधी १५० कोटींचा निधी देण्यात आला आहे. मात्र उर्वरित निधीवाटपात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना २० ते २५ लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांना दोन ते अडीच कोटींचा निधी वाटप करीत सर्वपक्षीय गटनेत्यांना शांत केले आहे. तर सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना आठ ते १० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आल्याने विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. उर्वरित ४२३ कोटी रुपयांचा निधी सर्वपक्षीयांना समसमान वाटप करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये असमान निधी वाटपाने कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये तफावत वाढेल, ज्या भागांना कमी निधी मिळतो तिथे रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या यांसारख्या मूलभूत सुविधा मागे पडतील. यामुळे काही भाग अत्याधुनिक होतील, तर काही भाग मागासलेले राहतील, अशी भीती नगरसेवकांमध्ये आहे.
दीर्घकालीन शहरी नियोजन बिघडेल
शहराचा समतोल विकास न झाल्यास संपूर्ण मुंबईच्या विकासाचा वेग कमी होऊ शकतो. शहराची स्पर्धात्मकता घटू शकते. असमान निधी वाटप हा केवळ आर्थिक मुद्दा नाही, तर तो सामाजिक, राजकीय आणि शहरी विकासाशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. योग्य नियोजन, पारदर्शकता आणि विकासाचे समतोल वितरण न झाल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतील, अशी भीती काही जाणकारांनी दिली आहे.
-----------
मुंबई महापालिकेचा विकास निधी हा कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही. तो नागरिकांच्या करापोटी जमा झालेला पैसा आहे. तो नागरिकांच्या गरजा ओखळून वापरला गेला पाहिजे. पक्षीय पातळीवर त्याचे वाटप होता कामा नये. पक्षीय पातळीवर निधीचे वाटप ही पद्धात चुकीची आहे. निधीवाटपाचे धोरण लोकाभिमुख हवे, ते पक्षहितासाठी नसावे.
- चंद्रशेखर प्रभू, नगर नियोजक आणि व्यवस्थापन तज्ज्ञ
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.