कर्जतमध्ये बैलगाडा शर्यतींच्या आड सट्टा
तरुणाईच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
कर्जत, ता. १२ (बातमीदार) ः तालुक्यात सध्या दर रविवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी पारंपरिक बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात होत आहेत. शेतकऱ्यांचा आवडता छंद आणि ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या शर्यतींना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, परंतु या खेळाच्या आडून येथे जुगार आणि सट्ट्याचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
बैलगाडा शर्यतीचा खेळ शेतकरीवर्गासाठी अभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. शेतीच्या कामातून वेळ काढून शेतकरी आपल्या बैलांसह या शर्यतीत सहभागी होत असतो. मात्र, अलीकडच्या काळात या खेळाच्या आडून लाखो रुपयांची पैज लावली जात असल्याचे चित्र दिसत आहे. रविवार (ता. १२) शिरसे येथील बेलगाडा शर्यतीच्या मैदानात सात ते आठ स्टॉल लावून सट्टा खेळला जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे शर्यत पाहण्यासाठी येणारी तरुणाई या व्यसनाकडे ओढली जात असून, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. बैलगाडा शर्यत हा सांस्कृतिक वारसा जपताना त्याआड चालणाऱ्या बेकायदा जुगारावर आळा घालणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. अनेक ठिकाणी जुगार आणि मटका अड्डे उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. मात्र, ग्रामीण भागातील हा सट्टा बाजार या मोहिमेला एकप्रकारे आव्हानच देत असल्याचे दिसून येत आहे.
सट्टा चालविणे गैर असून, याबाबत आम्ही गंभीर दखल घेत आहोत. याबाबत अधिकृत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
- राहुल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्जत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.