तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणाऱ्या आशाताईंच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणाऱ्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
----
भारतीय संगीतसृष्टीतील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या ‘पद्मविभूषण’, ‘महाराष्ट्र भूषण’ आशा भोसले यांच्या निधनामुळे देशाने एक महान स्वरसम्राज्ञी गमावली आहे. त्यांच्या गाण्यांनी आपल्याला इतकं समृद्ध केलं, की त्या कधीतरी आपल्याला सोडून जातील ही कल्पनाच सहन होत नाही. घराघरात कोणीतरी आपल्या परिवाराचा सदस्य गमावल्याचे दुःख आज होत आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
-----
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. त्यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. हे दुःख सहन करण्याची त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना शक्ती मिळो.
- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
------
शास्त्रीय संगीत असो किंवा उडत्या चालीची गाणी, प्रत्येक सुराला स्वतःच्या अनोख्या शैलीने जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग मावळले आहे. आशा भोसले यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.
- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद
-----
आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला. भावनांना स्पर्श केला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. लतादीदी यांच्यानंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या होत्या. भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला. त्यांचे गाणे हेच त्यांचे अमरत्व राहील. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
----
आपल्या जादुई आवाजाने तब्बल आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. वीसहून अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला. आशाताईंच्या निधनाने जगाला भुरळ घालणारा चिरतरुण आवाज हरपला आहे.
- हर्षवर्धन सपकाळ, काॅँग्रेस प्रदेशाध्यक्ष
----
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर आशाताईंनी वादळं पाहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत. दुःख हाताळायची त्यांनी कला आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या. त्यांचा गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास चिरकाल तुमच्या-माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील. लतादीदी आणि आशाताई म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो. उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला.
- राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.