खारघरमधील जुने तलाव धोक्यात
भूमिगत जलमार्गांवर अवलंबल्यामुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे संकट
खारघर, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबईतील नियोजित उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर परिसरातील ग्रामपंचायतकालीन जुने तलाव सध्या अस्तित्वाच्या संकटाला सामोरे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. भूमिगत जलमार्गांवर वाढते अवलंबून राहिल्यामुळे आणि शहरीकरणाच्या वेगवान प्रक्रियेमुळे या तलावांकडे दुर्लक्ष होत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या तलावांची जागा सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित करून त्यांचा सर्वांगीण विकास व जतन करण्याची मागणी जोर धरत आहे.
खारघर आणि ओवे गट ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात येथील कोपरा तलाव, बेलपाडा तलाव, खारघरगाव तलाव, पेठगाव तलाव तसेच खुटूक बांधण आणि पापडीचा पाडा येथील तलाव हे स्थानिक जीवनाचा अविभाज्य भाग होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातील विसर्जन तसेच दैनंदिन वापरासाठी हे तलाव महत्त्वाचे होते. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे अनेक तलाव दुर्लक्षित झाले असून, काही तलाव भूमिगत करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पापडीचा पाडा परिसरात तलावावर भराव टाकून सपाटीकरण सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पालिकेच्या अधिकृत नोंदीमध्ये सध्या खारघरगाव, घरकुल कोपरा आणि पेठगाव हे तीन तलावच अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. उर्वरित तलावांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
चौकट
तलाव संवर्धन गरजेचे
तज्ज्ञांच्या मते, हे तलाव केवळ पाणीसाठा नसून पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भूमिगत जलमार्गांवर अवलंबून राहिल्यास भूजल पातळीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तलावांचे जतन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करणे गरजेचे आहे.
बॉक्स
स्थानिकांचा पाठपुरावा
पापडीपाडा गावातील तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तलावाचे पालिकेकडे हस्तांतरण व्हावे यासाठी पत्रव्यवहार सुरू असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोट:
बेलपाडा तलाव हा ग्रामपंचायतकालीन तलाव आहे. या तलावाच्या विकासासाठी सिडकोकडे पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. पालिकेने हा तलाव स्वतःकडे हस्तांतरित करून विकास करावा.
-संजय घरत, माजी उपसरपंच, खारघर ग्रामपंचायत
ग्रामपंचायतकालीन तलाव ही गावाची ओळख आहे. त्यामुळे हे तलाव वाचवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी पालिका प्रशासनाने सिडकोकडे पाठपुरावा करावा.
- हरेश केणी, नगरसेवक
पालिका हद्दीतील तलावांचा विकास पालिकेकडून सुरू आहे. खारघरमधील ग्रामपंचायतकालीन तलावांची नोंद सिडकोकडे आहे का, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. - संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.