ठाणे जिल्हा तापला
बदलापूरसह शहरांत पारा ४१° वर
बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : मागील काही दिवसांपासून तापमानात झालेली घट आणि अधूनमधून जाणवलेला थंडावा यामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा एकदा हवामानात बदल होत तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी (ता. १२) बदलापूर शहराचा पारा थेट ४१° वर पोहोचल्याने उकाड्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.
ठाणे जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळेत सूर्याचा तडाखा इतका तीव्र होता की रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसून आले. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळले, तर अनेकांनी थंड पेय, पंखे व एसीचा आधार घेत उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी व द्रवपदार्थ सेवन करावे, हलके व सैलसर कपडे परिधान करावेत, तसेच डोके झाकूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी व्यक्त केली असून, ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेच्या या वाढत्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे.
वाढलेले तापमान
ठाणे येथे ३९.९°
कळवा ४०.९°
मुंब्रा व दिवा ४१°
डोंबिवली ४१.२°
कल्याण ४१.४°
तळोजा ४१.७°
पलावा ४२°
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.