स्वतःपासूनच वृक्षलागवडीची सुरुवात करा!
‘जागर २०२६’ व्याख्यानमालेत सयाजी शिंंदे यांचे आवाहन
वाशी, ता. १२ (बातमीदार) : ‘‘जगात सर्वप्रथम झाडे आली आणि नंतर माणूस. माणसांनंतरही झाडेच टिकून राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वयाइतकी झाडे लावावीत आणि कोणीतरी पुढाकार घेईल याची वाट न पाहता स्वतःपासूनच सुरुवात करावी,’’ असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी आज वाशीत केले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक येथे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जागर २०२६’ व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला.
शिंदे म्हणाले, ‘‘लहानपणी पाहिलेली झाडे आज दिसत नाहीत, ही जाणीव झाल्यानंतर निसर्गाचे होणारे नुकसान प्रकर्षाने जाणवले आणि तेथूनच वृक्षारोपणाची प्रेरणा मिळाली.’’ ‘सह्याद्री देवराई’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध देशी वृक्ष, वेली व वनस्पतींचे संवर्धन करण्याचा संकल्प त्यांनी मांडला. राज्यभर किमान १०० देवराया उभ्या करून त्यामध्ये हजारो प्रजातींचे जतन करण्याचे स्वप्न त्यांनी व्यक्त केले.
मुलांमध्ये लहानपणापासून वृक्षप्रेम रुजवणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी ‘चला सावली पेरूया’ हा उपक्रमही सुचविला. विद्यार्थ्यांनी बियाणे पेरून त्याची वाढ नोंदवावी. यामुळे झाडाशी नाते निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले. वाढदिवस, परीक्षेचा निकाल यांसारख्या प्रसंगी एक झाड लावण्याची सवय लावावी. वृक्षारोपण करताना पाणी, खत व संरक्षणाची योग्य व्यवस्था असल्याची खात्री करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘‘झाड अन्न, ऑक्सिजन, सावली देते; मात्र आपण झाडे लावण्यात मागे पडतो, हा मोठा विरोधाभास आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.
देवळांमध्ये ‘वृक्षप्रसाद’ देण्याची संकल्पना, ‘सेलिब्रिटी झाडे’ तयार करून त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे अशा अभिनव कल्पनाही त्यांनी मांडल्या. झाडांच्या संगोपनातून मिळणारा आनंद हे एक प्रकारचे ध्यान (मेडिटेशन) असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.