घरगुती गॅसचा बोजवारा
- बोईसर पूर्वेत संतापाचा उद्रेक, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
बोईसर, ता. १३ (वार्ताहर) : बोईसर पूर्वेकडील सुतारपाडा, दांडीपाडा, लोखंडीपाडा, धनानीनगर, काटकरपाडा, गणेश नगर आदी परिसरांमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे कोलमडल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक दिवसांपासून सिलिंडरसाठी वणवण करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
या प्रश्नावर शिवसेना बोईसर शहराच्या वतीने शहर प्रमुख अतुल रमेश देसाई यांनी जिल्हाधिकारी व पुरवठा विभागाकडे तक्रार निवेदन सादर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मोठ्या लोकवस्तीच्या या भागात एच.पी. गॅस एजन्सीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात इण्डेन व भारत गॅस कंपन्यांकडून सुरळीत पुरवठा होत असताना फक्त एच. पी. गॅसचाच बोजवारा उडाल्याने प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही एजन्सीकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. दरम्यान, प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून एच.पी. गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा शिवसेना स्टाइलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
-------------------
एच.पी. गॅस एजन्सीकडून जर नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला गेला, तर तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत आम्ही गॅस एजन्सीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहील.
- अतुल देसाई, शिवसेना शहरप्रमुख, बोईसर
---------------------------------
पुरवठामध्ये काही ठिकाणी अडचणी आल्या होत्या, परंतु शुक्रवारपासून पुरवठा सुरळीत होईल. याबाबत मी तक्रारदारांशी बोलून घेतो.
- चेतन घरत, एचपी गॅस एजन्सी, बोईसर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.