मजगी, जुनी भातशेती दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर
डहाणूतील भात खाचरांचे रूप पालटणार
कासा, ता. १३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील भातशेती अधिक सुपीक, टिकाऊ व उत्पादनक्षम करण्यासाठी कृषी विभागाने मजगी आणि जुनी भातशेती दुरुस्तीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. सध्या ही कामे युद्धपातळीवर सुरू असून, मृद व जलसंधारणाच्या माध्यमातून जमिनीची धूप रोखणे आणि पावसाचे पाणी साठवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे तालुक्यातील पारंपरिक भात खाचरांचे रूप पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मान्सूनपूर्व कालावधीतच ही कामे पूर्ण करण्यावर कृषी विभागाचा भर असून, त्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारी सुपीक माती अडवून ती शेतात साठवता येणार आहे. परिणामी जमिनीची सुपीकता वाढून भातपिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील सुकटआंबा, चळणी, दिवशी दाभाडी, गडचिंचले, डेहणे पळे, रायतळी, ओसरवीरा, देऊर इत्यादी गावांमध्ये मजगी व भातशेती दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर असून, यामुळे भाताबरोबरच नाचणी क्षेत्रातही वाढ होणार आहे. याशिवाय खरीप हंगामात बांधांवर तूर लागवड व नाचणी पिकांच्या प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे.
जुन्या व ढासळलेल्या बांधांची दुरुस्ती केल्यामुळे शेतात पाणी साठवण्याची क्षमता वाढणार असून, पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आर्द्रता टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या योजनेमुळे केवळ शेतीपुरतेच नव्हे, तर स्थानिक रोजगारालाही चालना मिळाली आहे. पूर्वी कामाच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या अनेकांना या कामांमुळे गावातच रोजगार उपलब्ध झाला असून, टाकाऊ समजल्या गेलेल्या जमिनी पुन्हा लागवडीखाली येण्यास मदत झाली आहे.
दिवशी दाभाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पार्वती पिलेना यांनी सांगितले, की आमच्या भागात सध्या पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात मजगी योजनेअंतर्गत काम सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले असून, स्थलांतर थांबण्यास निश्चितच मदत होणार आहे. या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या २५० शेतकऱ्यांनी कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लाभार्थ्यांनी तूर व नाचणी बियाण्यांसाठी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून मागणी नोंदवावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डॉ. जगन सूर्यवंशी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.