मुख्य सूत्रधारासह पाच जण अटकेत
ऐरोली गोळीबार प्रकरण
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : नवी मुंबईतील ऐरोली येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाचा गुन्हे शाखेने उलगडा करीत मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, जुन्या आर्थिक वादातून हल्ल्याचा कट रचल्याचे समोर आले आहे.
ऐरोली येथे ६ एप्रिलला आरटीआय कार्यकर्ता अमित मौर्य आणि बिल्डर संदीप गवस यांच्यावर झालेल्या प्राणघातक गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट-१ला यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य शूटर आणि कटाचा सूत्रधार असलेल्या बेकरी व्यावसायिकासह एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार गुरफान खान असून, तो आणि संदीप गवस हे २०१६पर्यंत बांधकाम व्यवसायात भागीदार होते; मात्र आर्थिक वादातून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यानंतर गवस यांनी अमित मौर्य याच्या मदतीने आरटीआयच्या माध्यमातून गुरफानच्या बेकायदा बांधकामांविरोधात तक्रारी केल्या होत्या. परिणामी त्याची काही बांधकामे पाडण्यात आली होती. याच रागातून गुरफान खानने गवस यांचा खून करण्याचा कट रचला. यासाठी त्याने मकोकाअंतर्गत ११ वर्षांची शिक्षा भोगून नुकताच तुरुंगातून सुटलेल्या राहुल ऊर्फ पवन सहानी याला सुपारी दिली होती.
सेक्टर-१ परिसरात ६ एप्रिलला मध्यरात्री गवस आणि मौर्य हे आपल्या कारजवळ उभे असताना मोटारसायकलवरून आलेल्या राहुलने दोघांवर चार राउंड गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. घटनेनंतर रबाळे पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट-१ यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोराचा माग काढत या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळून जप्त केली. ही मोटारसायकल चोरीची असल्याचे पुढील तपासात स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी राहुल सहानीसह चोरीची दुचाकी पुरवणारा सय्यद खान, आर्थिक मदत करणारा नागेश माने आणि गवस यांच्या हालचालींची माहिती देणारा विशाल महाडिक अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.