रहिवासी भागातच गॅस वितरण; सूचनांना हरताळ, जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर
बोईसर, ता. १४ (वार्ताहर) : बोईसर ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत असलेल्या गॅस पुरवठाधारकाकडून नियमांकडे दुर्लक्ष करत रहिवासी भागातच गॅस सिलिंडरचे वितरण सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी ओसवाल परिसरात एजन्सीच्या कार्यालयालगत मोठ्या प्रमाणात गॅसचे वितरण करण्यात आले होते. हा परिसर पूर्णतः निवासी असल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर ठिकाणी ‘ऑफिसमध्ये सिलिंडर मिळणार नाही’ असा सूचनाफलक लावण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्याच ठिकाणी ग्राहकांना सिलिंडर दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा फलक केवळ दिखावा असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. गॅस सिलिंडरसारख्या ज्वलनशील वस्तूंचे वितरण रहिवासी भागात करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. ओसवाल परिसरात झालेल्या या वितरणावेळी कोणत्याही ठोस सुरक्षा उपाययोजना दिसून आल्या नसल्याचेही स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे जर त्या वेळी एखादी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या मते, अशा प्रकारे निष्काळजीने गॅस वितरण केल्यास एखादा अपघात होऊ शकतो. त्यामुळे रहिवासी भागातील अशा धोकादायक उपक्रमांना त्वरित आळा घालावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
---------------
कोट
रिटेलरमार्फत गॅसविक्री करताना मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे आढळले. ५८० रुपयांचा सिलिंडर १५०० ते २००० रुपयांना विकला जात होता. त्यामुळे ती पद्धत बंद करून थेट ग्राहकांना पारदर्शक वितरण सुरू केले आहे.
-कौशिक बर्वे, योगिनी, इंडियन गॅस एजन्सी)
--------------------
इंडियन गॅस एजन्सीसमोर ‘कार्यालयात गॅस वितरण होणार नाही’ असा फलक लावला असतानाही प्रत्यक्षात त्याच ठिकाणी वितरण सुरू आहे. हा परिसर पूर्णतः रहिवासी असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
- अजय दिवे, पंचायत समिती सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.