एआय हे संकट नसून आव्हान म्हणून स्वीकारा : गणेश नाईक
विरार, ता. १४ (बातमीदार) : बदलत्या काळात तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)ला न घाबरता त्याचा एक आव्हान म्हणून स्वीकार करा आणि भविष्यातील संधींसाठी तत्पर राहा, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी वसई येथे केले. या वेळी त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय व प्रशासकीय अनुभवातून उपस्थित विद्यार्थी आणि समाजबांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आगरी समाजातील विद्यार्थ्यांनी नाव कमवावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेताना एमपीएससी, यूपीएससी आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उच्च विद्याविभूषित मार्गदर्शकांच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
आगरी समाज विकास मंडळ, वसई तालुकाचे ४१ वे स्नेहसंमेलन, वार्षिक बक्षीस समारंभ व सांस्कृतिक आणि कला-क्रीडा महोत्सव, लक्ष्मीबाई भिवा मानकर सभागृह, श्री हनुमान मंदिर दिवणमान, वसई येथे आयोजित करण्यात आला होता. यासाठी पालकमंत्री गणेश नाईक, लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर, आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर नारायण मानकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विजय पाटील हे उपस्थितीत होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, समाजाच्या कार्यक्रमांमध्ये आता राजकीय नेत्यांना बोलावण्याऐवजी स्पर्धा परीक्षा, यूपीएससी, एमपीएससी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांना प्राधान्य द्यावे. तरुणांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे हीच काळाची गरज असल्याचे ही ठाकूर यांनी सांगितले.
याप्रसंगी त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि संस्थांच्या वाटचालीवर भाष्य केले. आगरी समाज विकास मंडळाची शाळा आणि वसई प्रगती पतसंस्था या दोन्ही संस्थांनी केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी या संस्थांविरुद्ध खोट्या तक्रारी करतात याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमात महिलांचे दिसलेले वर्चस्व आणि व्यासपीठावरून त्यांचे प्रभावी बोलणे, हे आगरी समाजाच्या हिमतीचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे, अशा शब्दांत ठाकूर यांनी उपस्थित महिलांचे कौतुक केले. या कार्यक्रमात माजी महापौर नारायण मानकर व विजय पाटील यांचीही मार्गदर्शन पर भाषणे झाली.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष भरत भोईर, उपाध्यक्ष भरत घरत, सेक्रेटरी ॲड. दयानंद मानकर, कोषाध्यक्ष जयकिसन मानकर, उपसचिव ॲड. तृप्ती भोईर तसेच वसई प्रगती सहकारी पतसंस्थेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.