टोकावडे, ता. १४ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरकारच्या आदेशांचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन होत नाही. तसेच, बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही अद्याप लागू केलेली नाही. यात प्रशासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते वामन खाकर यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी पंचायत समिती मुरबाड येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
खाकर यांच्या तक्रारीनुसार, ग्रामविकास विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या सरकारी निर्णयानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी पंचायत समिती मुरबाड कार्यालयाने १७ फेब्रुवारीला आदेश काढून सर्व ग्रामपंचायतींना बायोमेट्रिक यंत्रणा बसवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आदेशानंतरही तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी अद्याप बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू केलेली नाही. संबंधित अहवालही सादर केला नाही, असे तक्रारीत नमूद केले आहे. वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसविणे ही गंभीर बाब असून, त्यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर परिणाम होत असल्याचे खाकर यांनी स्पष्ट केले. या तक्रारीमुळे मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रमुख मागण्या
सरकारच्या आदेशाचे काटेकोर पालन न केल्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे, प्राथमिक चौकशी करून अहवाल जिल्हा परिषद ठाणे येथे सादर करणे, सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली सक्तीने लागू करणे आणि प्रणाली लागू केलेल्या ग्रामपंचायतींची यादी सार्वजनिक करणे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.