सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ठाणे आणि मुलुंडदरम्यानच्या विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी रेल्वे मंडळाने २५६ कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. २०२९ पर्यंत हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावरून दररोज १० ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रचंड भारामुळे स्थानकावर होणारी गर्दी नियंत्रणाबाहेर जात आहे. त्याचे विभाजन करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान विस्तारित स्थानक बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, मात्र गेल्या १० वर्षांमध्ये या प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्व मेगाब्लॉक दूर केल्यानंतर अखेरच्या क्षणी निधीवर या प्रकल्पाचे इंजिन अडले. २०१८मध्ये या प्रकल्पाचा निधी २६३ कोटी होता, तो आता ३२७ कोटींच्या घरात पोहोचला. या खर्चाचा १९० कोटींचा भार ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत उचलण्याची तयारी दाखविली. त्यानुसार स्थानक परिसरातील विकासकामे करण्यात आली आहेत, मात्र कोरोनापासून पालिकेची आर्थिक स्थिती बिघडली असून, स्मार्ट सिटीची मुदतही संपली आहे.
या परिस्थितीची दखल घेऊन रेल्वे मंडळानेच निधीचा भार उचलून विस्तारित ठाणे स्थानकाला गती देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्र्यांकडे गेल्यावर्षी केली होती. त्याबाबत सतत पाठपुरावा केल्यानंतर १८५ कोटींचा अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र मार्चमध्ये झालेल्या बैठकीमध्ये तर रेल्वेने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला २५६ कोटींचा संपूर्ण भार उचलण्याची तयारी दर्शविली. तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता नवीन विस्तारित स्थानकाच्या कामाची निविदा रेल्वे मंत्रालय काढणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पालिका ठेवणार लक्ष
नवीन विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम रेल्वे मंत्रालय हाती घेणार असून, या कामावर देखरेख ठेवण्याचे काम ठाणे महापालिका करणार असल्याचे बैठकीत निश्चित झाले आहे. हा प्रकल्प २०२९ पर्यंत ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, अशा युद्धपातळीवर पूर्णत्वास नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.
असे असेल नवीन स्थानक...
जागा : जुन्या मनोरुग्णालयाच्या १४.८३ एकर जागेवर स्थानकाची उभारणी
इमारत : ३.७७ एकरवर तळमजला अधिक दोनमजली आधुनिक इमारत
फलाट : स्थानकात एकूण तीन फलाट असतील, ज्यापैकी एक होम प्लॅटफॉर्म
कनेक्टिव्हिटी : प्रवाशांच्या सुविधेसाठी तीन पादचारी पूल
सॅटिस प्रकल्प : स्थानकाच्या इमारतीसमोर १५० मीटर लांब आणि ३४ मीटर रुंद सॅटिस डेक
पार्किंग : अडीच एकर जागेत २५० चारचाकी आणि दुचाकी गाड्यांसाठी अद्ययावत पार्किंग व्यवस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.