पालिका मैदानावर बेकायदा ताबा
स्पोर्ट्स क्लबची प्रशिक्षणाच्या नावाखाली सर्रास लूट
खारघर, ता. १४ (बातमीदार) : खारघरमधील पालिकेच्या सार्वजनिक मैदानांवर काही खासगी स्पोर्ट्स क्लबकडून बेकायदेशीर ताबा घेऊन ‘प्रशिक्षण’च्या नावाखाली नागरिकांची सर्रास आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सिडकोने वसाहतीच्या नियोजनात नागरिकांसाठी खुली मैदाने उपलब्ध करून दिली होती; मात्र आता या मैदानांवर काही क्लबचे वर्चस्व निर्माण झाले असून, सामान्य नागरिक, लहान मुले आणि युवक यांना मुक्तपणे खेळण्यास मज्जाव केला जात आहे.
काही प्रशिक्षकांनी राजकीय पाठबळाच्या जोरावर खासगी अकॅडमी सुरू करून मैदानांचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. क्रिकेट, फुटबॉल, हॅण्डबॉल, स्केटिंग यांसारख्या खेळांच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असून, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पालिकेच्या मालमत्तेचा वापर व्यवसायासाठी केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या मते, सार्वजनिक मैदानांचा मूळ उद्देशच हरवला असून, ती काही मोजक्या व्यक्तींच्या उत्पन्नाचे साधन बनली आहेत. वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने चौकशी करून संबंधित क्लबवर कडक कारवाई करावी, मैदान नागरिकांसाठी खुले करावे आणि राजकीय हस्तक्षेपाला आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.
चौकट :
एका क्रिकेट प्रशिक्षकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खेळाडूकडून दरमहा सुमारे दोन हजार रुपये शुल्क आकारले जाते. एका अकॅडमीमध्ये साधारण ४० ते ५० मुले सराव करत असून, त्यातून महिन्याला ८० हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळते. याशिवाय शनिवार-रविवारी क्रिकेट सामने आयोजित करताना प्रति खेळाडू ३०० ते ५०० रुपये शुल्क घेतले जाते. तसेच एका सामन्यासाठी मैदान वापर शुल्क म्हणून सुमारे पाच हजार रुपये आकारले जातात. पालिकेच्या सार्वजनिक मैदानावरच हा व्यवहार होत असल्याने, प्रशिक्षण शुल्क आणि सामन्यांमधून मिळणारे उत्पन्न मिळून संबंधितांकडे महिन्याला जवळपास दोन लाख रुपयांची कमाई होत असल्याचे समोर आले आहे.
कोट :
खारघर शहरात क्रिकेटच्या नावाखाली काही स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांकडून उद्याने आणि खेळाची मैदाने यांचा अनधिकृत गैरवापर होत असल्याची बाब समोर येत आहे. असे असले तरी काही ठराविक अकॅडमींमधील खेळाडू मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विविध वयोगटांतून खेळत असून, शाळा, महाविद्यालय तसेच नवी मुंबई प्रीमियर लीग स्पर्धांमध्येही संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही बाब खारघर तसेच पनवेल महापालिका क्षेत्रासाठी अभिमानाची मानली जात आहे.
- कृष्णा खडगी, प्रशिक्षक, जयहिंद स्पोर्ट्स क्लब
कोट : खारघर प्रभाग कार्यालयातील कर्मचारी पाठवून सर्व मैदानाची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- प्रसंजित कार्लेकर, उपायुक्त पनवेल महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.