सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : गोरगरीब रुग्णांना गंभीर आजारांवरील खर्च हा परवडणारा नसतो. या आर्थिक बोजामुळे सामान्य रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत करण्यात येते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात दोन हजार ५१४ रुग्णांना २१ कोटी ७४ लाखांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभाग रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रुग्णालय, धर्मादाय रुग्णालय, संस्था, दाते आदींचे सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. यामध्ये २० गंभीर आजारासाठी मदत करण्यात येते.
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या मागील आर्थिक वर्षात राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी सहा लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. याच कालावधीत ठाणे जिल्ह्यातील २,५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख ५० हजारांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रुग्णांना वेळेत अर्थसहाय्य होत आहे. गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
गरजू बालकांसाठीही मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाउंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.
या गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य
कॉक्लियर इम्प्लांट (वय २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे व गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.