रासायनिक, वैद्यकीय कचऱ्याला भीषण आग
सुदैवाने मोठा अनर्थ तळला
रोहा, ता. १४ (बातमीदार) ः कुंडलिका नदीच्या पुलाजवळ अष्टमी नदीकाठी बेकायदा टाकण्यात आलेल्या रासायनिक, वैद्यकीय कचऱ्याला सोमवारी (ता. १३) रात्री अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
अष्टमी नाक्यावर नदीकिनारी अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणात रासायनिक, वैद्यकीय कचरा आणून टाकला होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास या कचऱ्याला अचानक आग लागली. रसायन आणि प्लॅस्टिक असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरून नागरिकांना श्वास घेण्याच्या तक्रारी जाणवू लागल्या. या घटनेची माहिती मिळताच रोहा नगर परिषदेचे सभापती महेंद्र दिवेकर, सभापती नीता हजारे, नगरसेवक प्रशांत कडू, नगरसेविका फराहा पानसरे, अकिब येरुणकर, रोहित हजारे, सागर भोबड, बंटी चांदगावकर आणि अन्य नागरिकांनी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. घटनास्थळी मेडिकल लॅब वेस्ट, आइस पॅड्स, औषधांच्या बाटल्या आणि सलाइनचा मोठा साठा जळत असल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
दोषींवर कठोर कारवाईचे संकेत
१. सभापती महेंद्र दिवेकर यांनी संताप व्यक्त केला असून, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने कुंडलिका नदी संवर्धनासाठी मोठा निधी आणून नदी प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच काही विघ्नसंतोषी मंडळी असे कृत्य करून नदीपात्र प्रदूषित करीत आहे. रासायनिक, वैद्यकीय कचरा टाकून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिवेकर यांनी दिला.
२. परिसरातील संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर नागरिकांनी लक्ष ठेवावे आणि असे प्रकार घडत असल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले. घडलेली घटना दुर्दैवी असून जिल्हा आणि तालुका आरोग्य विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिवेकर यांनी केली.
फोटो कॅप्शन : अष्टमी नदीकाठी रासायनिक, वैद्यकीय कचऱ्याला लागलेली भीषण आग दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.