अलिबागच्या सुकटीला राज्यभरातून मागणी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : अलिबाग किनारपट्टीवरील सुकटी (सुकी मासळी) सध्या राज्यभरातील खवय्यांच्या पसंतीस उतरली असून, तिची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागांतून ग्राहक मोठ्या प्रमाणावर सुकट खरेदीसाठी येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
पावसाळा जवळ येत असल्याने अगोदरच सुक्या मासळीचा साठा करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असते. त्यामुळे या काळात सुकटी, जवळा, बोंबील, कोळंबी यांसारख्या सुक्या मासळीवरच खवय्यांची भूक भागवली जाते. यामुळे सध्या बाजारात सुकटीला चांगली मागणी निर्माण झाली आहे. पर्यटनाचादेखील या मागणीवर मोठा परिणाम दिसून येतो. श्रीवर्धन, दिवेआगर, मुरूड परिसरात येणारे पर्यटक परतीच्या प्रवासात सुकटीसह विविध वाळवण पदार्थ खरेदी करून नेतात. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेला मोठा आधार मिळत आहे. एकूणच, अलिबागची सुकटी ही स्थानिक पारंपरिक उत्पादन असून, तिच्या चव आणि टिकाऊपणामुळे राज्यभरात तिची मागणी वाढत आहे. त्यामुळे कोळी समाजासह स्थानिकांना आर्थिक बळ मिळत असून, हा व्यवसाय दिवसेंदिवस अधिक बहरत चालला आहे.
२५० ते ३०० रुपये भावाने विक्री
अलिबाग, सासवणे, आक्षी, वरसोली या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर मासळी सुकवण्याचे काम सुरू आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उन्हात कोळीवाड्यांमध्ये मासळी वाळवण्याची लगबग सुरू असून, महिलांसाठीही हा रोजगाराचा महत्त्वाचा स्रोत ठरत आहे. सुकटीसह विविध सुक्या मासळीच्या भावातही वाढ झाली असली तरी ग्राहकांची मागणी कमी झालेली नाही. सुकटी किलोला सुमारे २५० ते ३०० रुपये भावाने विकली जात असून, इतर प्रकारच्या सुक्या मासळीलादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या ऊन चांगला पडत असल्याने त्याचा फायदा मासळी सुकवण्यासाठी होत आहे. मॉन्सून सुरू होण्यापूर्वी मासेमारी बंद होईल, यामुळे जास्ती-जास्त मासळी पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक कारणाने मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी खवय्यांचे प्रमाण सतत वाढत आहे.
- धर्मा घारबट, अध्यक्ष, मच्छीमारी सहकारी संस्था, वरसोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.