रस्त्यांच्या कामामुळे धुळीचे साम्राज्य
नागरिकांना श्वसनाचे आजार; व्यापारीवर्गाचे नुकसान
अलिबाग, ता. १५ (वार्ताहर) ः अलिबाग तालुक्यात सध्या एमएसआरडीसीकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, श्वसनासंबंधीच्या तक्रारी जाणवत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याकडेला असणाऱ्या दुकानांमधील वस्तू व मालाचे धुळीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने दिवसातून किमान दोन ते तीन वेळा रस्त्यावर पाण्याचा मारा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अलिबाग तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम मागील सात ते आठ महिन्यांपासून एमएसआरडीसीकडून सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून त्यावर सिमेंट खडी व मुरूमाचे थर टाकण्यात आले आहेत. मात्र, या कामादरम्यान उडणाऱ्या धुळीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या मार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे खोदकाम केलेल्या आणि मुरूम टाकलेल्या रस्त्यावरून वाहने गेली की प्रचंड धूळ उडून समोरील वाहन दिसेनासे होते. त्यामुळे अपघाताचा मोठी धोका संभवतो. यामुळे दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
दिवसभर उन्हात तापलेल्या सिमेंट खडीमुळे धुरळा अधिक वाढतो. या मार्गावरून प्रवास करताना अक्षरशः श्वास गुदमरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, डोळे, नाक, तोंडात धूळ शिरते. दुचाकीस्वारांसाठी हा प्रवास करणे कठीण झाले आहे. या मार्गावरून प्रवास करताना कपड्यांवर धुळीचा थर साचतो. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांमधील वस्तू व मालाचे धुळीमुळे मोठे नुकसान होत आहे. अनेक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याचे खोदकाम करून मुरूम टाकण्यात आला असला तरी त्या कच्च्या रस्त्यावर नियमित पाणी मारले जात नाही. परिणामी, धुळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कामादरम्यान दोन ते तीन वेळा पाण्याचा मारा करावा, अशी मागणी होत आहे.
हे मुख्य रस्ते धुळीच्या विळख्यात
अलिबाग बायपास रस्ता आणि कुरूळ परिसर
अलिबाग-मुरूड रस्ता
कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा हा अंतर्गत मार्ग
धुळीमुळे श्वसनाचे आजार
रस्त्यावरून उडणारी धूळ श्वासावाटे शरीरात जाऊन श्वसनसंस्थेत साचते. हे धूलिकण फुप्फुसात व श्वसननलिकेत जमा होतात. ॲलर्जी असणाऱ्यांना सर्दी, खोकला, कफ, धाप लागणे असे त्रास वाढले आहेत, तर काहींना घशात दुखणे, डोळ्यांची जळजळ, सतत शिंक येणे, अशी लक्षणांची गर्दी दवाखान्यांत वाढली आहे.
एकेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी
रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचा मनस्ताप स्थानिक नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह पर्यटकांनाही सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक अलिबाग, मुरूडमध्ये येत आहेत. मात्र, रस्त्यांची खोदाई, वाहतूक कोंडी, धूळ यामुळे सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.