जव्हार बस स्थानकात पोलिस मदत केंद्राचा अभाव
चोरी, लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ
जव्हार, ता. १५ (बातमीदार) : आदिवासी तथा दुर्गम तालुका असलेल्या जव्हारमध्ये ४८ ग्रामपंचायती व दोन ग्रामदान मंडळे आहेत. तालुक्यातील प्रशासकीय कारभार हा जव्हार शहरातून चालत असतो, त्या अनुषंगाने या भागातील नागरिक जव्हार शहरात दैनंदिन येत असतात. अनेकदा प्रवाशांना निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, या स्थानकात पोलिस मदत केंद्राचा अभाव असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
शहरातील बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथे पोलिस मदत केंद्र उपलब्ध नसल्याने, चोरट्यांचे फावते आहे. दरम्यान, पाकीटमारी, दागिने चोरी जाण्याच्या दिवसागणिक काही घटना घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलिस मदत केंद्राची मागणी जोर धरत आहे. जव्हार शहर हे ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, खरेदी-विक्री, बँक आणि विविध प्रशासकीय कार्यालय असल्याने बस स्थानकात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. ग्रामीण भागातून येणारे प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना विशेषतः चोरट्यांचा फटका बसत आहे. गर्दीचा फायदा घेत पाकिटमार, मोबाइल चोरी आणि दागिने लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलिस मदत केंद्र असल्यास प्रवाश्यांना सोयीचे होऊ शकते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा महत्त्वाचा विषय प्रलंबित ठरत आहे.
येथील बस स्थानकात प्रवासी चोरी झाल्यानंतरही तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते. पोलिस ठाण्यात जाण्यात वेळ, प्रक्रिया आणि किरकोळ रकमेच्या नुकसानीमुळे तक्रारी टाळल्या जात असल्याचे सांगितले जाते आहे. यामुळे प्रत्यक्षात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तुलनेत नोंद होणाऱ्या तक्रारींची संख्या अत्यल्प आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकात कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणांची प्रभावी अंमलबजावणी आणि पोलिस मदत केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. अन्यथा येत्या काळात चोरीच्या घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती नागरिकांनी व्यक्ती केली आहे. याबाबत जव्हारचे आगार व्यवस्थापक बाळासाहेब झरीकर म्हणाले की, जव्हार पोलिस ठाणेमार्फत नियमित पेट्रोलिंग होत असते, स्थानकात पोलिस मदत केंद्र व्हावे यासाठी वरिष्ठ कार्यालयास मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------
जव्हार एसटी महामंडळाचे सुरक्षा रक्षक असतात. मात्र, बस स्थानक आणि आगार अशी दोन्ही जबाबदारी त्यांना सांभाळावी लागते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आणखी कर्मचारी वाढविणे आवश्यक आहे.
- मनीषा वाणी, प्रवासी