नवी मुंबईत १३ हजार महिलांसाठी सॅनिटरी पॅड पुरवठा
तीन वर्षांसाठी ३.२९ कोटींचा प्रस्ताव
तुर्भे, ता. १५ (बातमीदार ) : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा व ग्रंथालयांमध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅडची सुविधा अखंडित ठेवण्यासाठी समाजविकास विभागाने महत्त्वपूर्ण प्रस्ताव तयार केला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सॅनिटरी व्हेंडिंग मशीनसाठीचे कंत्राट संपुष्टात आल्यामुळे पॅड उपलब्धतेत अडचणी निर्माण झाल्या असून, नवीन पुरवठा व्यवस्था सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
महापालिकेच्या ६७ शाळा आणि २४ ग्रंथालयांमधील एकूण ९६ ठिकाणी सॅनिटरी व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून विद्यार्थिनी, शिक्षिका आणि इतर महिलांना सॅनिटरी पॅड पुरवले जातात. मात्र कंत्राट संपल्यामुळे या सेवेत खंड पडला आहे. याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर इयत्ता ६वी ते १०वीमधील १२,४२७ विद्यार्थिनी, महिला कर्मचारी आणि ग्रंथालयातील ५७३ महिलांसह सुमारे १३ हजार महिलांसाठी पॅड पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिलेस दरमहा किमान आठ पॅड देण्याचा विचार असून, त्यानुसार दरमहा सुमारे १.०४ लाख पॅडची गरज भासणार आहे.
प्रति पॅड ८.८० रुपये दर गृहित धरून मासिक खर्च ९.१५ लाख रुपये, वार्षिक खर्च १.०९ कोटी रुपये आणि तीन वर्षांसाठी एकूण खर्च ३.२९ कोटी रुपये अपेक्षित आहे. हा खर्च महिला व बालकल्याण या लेखा शीर्षकातून केला जाणार असून, ई-निविदा प्रक्रियेद्वारे पुरवठादार निश्चित केला जाईल.
चौकट
महिलांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक पाऊल
मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखणे, संसर्गजन्य आजार टाळणे आणि सार्वजनिक ठिकाणी सहज पॅड उपलब्धता सुनिश्चित करणे या दृष्टीने हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः शाळांमधील विद्यार्थिनींना या सुविधेमुळे आत्मविश्वास वाढण्यास आणि शिक्षणात खंड न पडण्यास मदत होणार असल्याने ही योजना आरोग्य व सन्मान जपणारी ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.