मुरबाड, ता. १५ (बातमीदार) : मुरबाड-कल्याण मार्गावर बुधवारी (ता. १५) सकाळी काळ्या-पिवळ्या जीपची वाहतूक बंद होती. त्यामुळे कल्याणकडे जाण्यासाठी एसटी बससुद्धा उपलब्ध नसल्याने संतापलेल्या प्रवाशांनी मुरबाड आगारात आंदोलन केले. प्रवाशांचा उद्रेक पाहून आगार व्यवस्थापक योगेश मुसळे यांनी मुरबाड-कल्याण मार्गावर दर १० मिनिटांनी बसगाड्या सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक शांत झाला आणि वाहतूक सुरू झाली.
मुरबाड-कल्याण मार्गावर झालेल्या काळ्या-पिवळ्या गाडीच्या अपघातात ११ प्रवासी ठार झाल्यानंतर या मार्गावर एसटी बस फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी बुधवारी मुरबाड शहर भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आली. त्याला प्रतिसाद देत आगार व्यवस्थापक मुसळे यांनी लांब पल्ल्याच्या दोन गाड्या बंद करून त्या गाड्या कल्याण-मुरबाड मार्गावर चालवण्याचे आश्वासन भाजप युवा मोर्चाला दिले. मुरबाड आगारात सकाळी प्रवाशांच्या आंदोलनावेळी दर १० मिनिटांनी कल्याण मार्गावर गाड्या सोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दुपार उजाडताच हरताळ फासण्यात आला. दर अर्ध्या तासाने मुरबाड-कल्याण मार्गावर बसगाड्या सोडणार असल्याचे सांगण्यात आले.
लांब पल्ल्याच्या गाड्या बंद
आंदोलनाला काही तास उलटताच मुरबाड-कल्याण-मुरबाड मार्गावर दर अर्ध्या तासाने बस सोडणार असल्याचे वेळापत्रक प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले. त्यासाठी मुरबाड आगारामार्फत चालवण्यात येणाऱ्या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या गुरुवारी (ता. १६) बंद ठेवण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.