ठाणे शहर, ता. १६ (बातमीदार) : सामान्य नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असून, ही त्यांच्या आरोग्याकरिता चिंतेची बाब ठरत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज सुमारे १० रुग्ण मानसिक उपचाराकरिता येत आहेत. चिंतेची बाब म्हणजे यातील बहुतांश रुग्ण सामान्य गरीब आणि मजूर कुटुंबातील आहेत. अनेकांना आपल्याला या प्रकारच्या आजाराची लक्षणे आहेत, याचीही कल्पना नसल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.
सरकारकडून सर्व शासकीय रुग्णालयात मोफत तपासणी आणि उपचार केले जातात. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातदेखील असे उपचार केले जात आहेत. या आजाराची लक्षणे कशी ओळखायची, पुढील आवश्यक उपचार कसे घायचे, अशा व्यक्तीसोबत कुटुंबीयांनी कसे वागायचे आदी मार्गदर्शन केले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात या प्रकारे तीन हजार ४५० जणांवर बाह्य विभागात उपचार केले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टर, समुपदेशक आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांना समुपदेशन, औषधोपचार आणि आवश्यक सहकार्य करतात. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याची माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विजय तेली यांनी दिली.
मानसिक आजारांविषयी समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून जनजागृती उपक्रम राबवले जातात. तणाव जाणवला तर तो मनात दडवू नका. तज्ज्ञांची मदत घ्या, असे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.
प्रमुख कारणे
नैराश्य, चिंताजन्य विकार, तसेच इतर मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. यामागे प्रामुख्याने कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी, कामाशी संबंधित तणाव आणि बदलती जीवनशैली आदी कारणे आढळून आली आहेत.
मानसिक आजार हे मेंदूतील जैव-रासायनिक असंतुलन, तणाव व सामाजिक घटकांच्या परस्पर परिणामातून उद्भवतात. वेळेत निदान व समुपदेशन-औषधोपचारांच्या एकत्रित उपचारपद्धतीमुळे रुग्णांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.