भास्कराचार्यांच्या जन्मभूमीत गणित विद्यापीठाची गरज ः दा. कृ. सोमण
ठाणे, ता. १६ (बातमीदार) : ठाणे येथे विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘कणाद ते कलाम’ या विषयावर खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
सोमण यांनी विश्वनिर्मितीपासून भारतीय वैज्ञानिक परंपरेचा आढावा घेतला. सुमारे १३.८ अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती झाली, तर पृथ्वी साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील लोणार विवराचा उल्लेख करत प्राचीन काळातील खगोल अभ्यासाची माहिती दिली. कणाद ऋषी यांनी मांडलेले अणुवाद, पाणिनी, सुश्रुत आणि चरक यांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. आर्यभट्ट, वराहमिहिर आणि ब्रह्मगुप्त यांच्या संशोधनामुळे भारतीय खगोलशास्त्र जगभर पोहोचले, असे त्यांनी नमूद केले.
भास्कराचार्य यांच्या लीलावती ग्रंथाचा उल्लेख करत त्यांनी चाळीसगावजवळील पाटण येथे गणित विद्यापीठ स्थापन करण्याची गरज व्यक्त केली. पुढे सवाई जयसिंग यांचे कार्यही त्यांनी सांगितले. समारोपात ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव करत, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. कार्यक्रमास श्रोत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.