ठाण्यात ज्येष्ठ नागरिकाची २० लाखांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : वीजबिलाचा बनावट संदेश तसेच गॅसबिल अपडेट करण्याच्या नावाखाली वयोवृद्धांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत असताना, आता ‘आरटीओ चलान’च्या बनावट संदेशाद्वारे ठाण्यातील माजिवाडा परिसरातील एका ज्येष्ठ व्यावसायिकाची तब्बल २० लाखांहून अधिक रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात एपीके फाइलच्या माध्यमातून मोबाईलचा संपूर्ण ताबा मिळवून लाखो रुपयांची रक्कम विविध खात्यांमध्ये वळती केली आहे.
माजिवाडा येथील लोधा पॅराडाईज परिसरात राहणारे ६१ वर्षीय हनुमंत यादव यांना २१ मार्च रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला. या संदेशात ‘तुमच्या वाहनावर आरटीओ चलान आहे’ असे नमूद करून अधिक माहितीसाठी एक लिंक देण्यात आली होती. विश्वास बसल्याने त्यांनी संबंधित लिंकवर क्लिक केले आणि एपीके फाइल डाउनलोड केली. ही फाइल डाऊनलोड होताच त्यांच्या मोबाईलचा पूर्ण प्रवेश सायबर गुन्हेगारांकडे गेला.
त्यानंतर त्यांच्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चालू व बचत खात्यातून स्वयंचलित पद्धतीने अनेक व्यवहार करण्यात आले. सोमवारी (ता.१३) सायंकाळी ५ वाजेपर्यंत १९ लाख ९९ हजार ०२१ रुपये आणि मंगळवारी (ता. १४) आणखी १७ हजार रुपये काढण्यात आले. अशा प्रकारे एकूण २० लाख १६ हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी यादव यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.