भिवंडी, ता. १६ (वार्ताहर) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत डम्पिंग ग्राउंडवरील गुटखा चोरीचा मुद्दा आणि शहरातील पाणीटंचाई या विषयांवर सदस्यांनी जोरदार आवाज उठवला. दरम्यान, स्थायी समिती सदस्य निवडीची नावे जाहीर न करताच बैठक संपविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बैठकीच्या सुरुवातीलाच पीठासन अधिकारी व महापौर नारायण चौधरी यांनी सदस्यांना आपापले प्रश्न मांडण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक कमलाकर पाटील, ॲड. वैभव भोईर व रोहिदास वाघमारे यांनी डम्पिंग ग्राउंडवरील नष्ट केलेल्या गुटख्याची चोरी झाल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. पालिकेच्या यंत्रणेचा वापर करून चोरी होत असताना प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर महापौरांनी प्रशासनाला तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा रंगली. काही भागांत अवेळी पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारींसह अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याची समस्या सदस्यांनी मांडली. या चर्चेत संदीप भोईर, वनिता भगत, रोमा आळशी, फराज बहाउद्दीन, जावेद दळवी यांसह अनेक सदस्य सहभागी झाले.
धोकादायक इमारती पाडकामात गैरव्यवहार
भाजप गटनेते संतोष शेट्टी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून धोकादायक इमारतींच्या पाडकामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. ठेकेदार, पालिका अधिकारी व जमीनमालक यांच्या संगनमताने रहिवाशांना बेघर करण्याचा डाव रचला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जमीनमालकांकडून कुटुंबांना बाहेर काढून जागा बळकावण्याचे प्रकार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्थायी समिती निवड बंद लिफाफ्यात
तीन महिन्यांनंतर होणारी स्थायी समिती सदस्य निवडही या महासभेचे प्रमुख आकर्षण होती. सभेच्या शेवटी गटनेत्यांनी आपापली नावे बंद लिफाफ्यात महापौरांकडे सुपूर्द केली. मात्र, ही नावे सभागृहात जाहीर न करताच बैठक समाप्त करण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही गटनेत्यांनी कोरे कागद दिल्याची, तर काहींनी दिलेली नावे बदलली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.