उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : मुरबाड-कल्याण मार्गावरील रायते पुलाजवळील भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उल्हासनगरमध्ये बेकायदा प्रवासी वाहतुकीला अद्याप लगाम लागलेला नाही. जीवाशी खेळ करणारी ओव्हरलोडिंगची धोकादायक प्रवृत्ती अजूनही बेधडक सुरू आहे. प्रशासनाच्या कारवाईनंतरही शहरातील परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही.
रायते पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघाताने ठाणे जिल्ह्याला हादरवून सोडले होते. या दुर्घटनेत ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतरही उल्हासनगर शहरातील ओव्हरलोडिंगवर कोणताही ठोस परिणाम झालेला दिसत नाही. विविध भागांमध्ये शेअर रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून खुलेआम वाहतूक सुरू आहे. नियमांनुसार तीन प्रवाशांना परवानगी असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक प्रवासी भरले जात असल्याचे चित्र आहे.
कमी भाडे आणि लवकर गंतव्यस्थानी पोहोचण्याच्या घाईमुळे प्रवासीदेखील अशा धोकादायक प्रवासाला भाग पडत आहेत. परिणामी, प्रत्येक प्रवास हा जीवावर बेतणारा ठरत असून, मोठ्या अपघाताची भीती कायम आहे.
स्वस्त प्रवासाचा महागडा धोका
प्रवासी ताराचंद जामनानी यांनी सांगितले की, कल्याण, नेहरू चौक, विठ्ठलवाडी किंवा सेक्शन १७ परिसरात रिक्षा चार प्रवासी होईपर्यंत पुढे सरकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. एका रिक्षाचालकाने सांगितले की, सकाळ-संध्याकाळच्या गर्दीतच जास्त प्रवासी घेतले जातात, अन्य वेळी कमी सवारी मिळते. मात्र, पोलिसांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईमुळे मिळकतीपेक्षा जास्त दंड भरावा लागतो, असेही त्याने स्पष्ट केले.
१७ चालकांवर कारवाई
वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी सांगितले की, ओव्हरलोडिंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर नियमित कारवाई सुरू असून, नुकतीच १७ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीदेखील त्यांच्यात सुधारणा झाल्याचे दिसत नाही. दरम्यान, या कारवाईनंतरही नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.