पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १६ : भिवंडी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन तब्बल २५ वर्षे उलटली, तरी शिक्षण विभागाला अद्याप कायमस्वरूपी शिक्षण अधिकारी मिळालेला नाही. गेल्या सहा महिन्यांपासून शाळांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे असल्याने शिक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून सुमारे १.५२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण ३१२ शाळा असून त्यापैकी १०७ शाळा महापालिकेद्वारे चालवल्या जातात. यामध्ये पहिली ते आठवीच्या ९६ आणि नववी-दहावीच्या ११ शाळांचा समावेश आहे. याशिवाय ६१ अनुदानित, २१ विनाअनुदानित आणि १२४ इंग्रजी माध्यमाच्या शाळा कार्यरत आहेत. या सर्व शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १.५२ लाख असून त्यांना शिकवण्यासाठी ३,८३४ शिक्षक कार्यरत आहेत. महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्येच २५,२३२ विद्यार्थी असून त्यांच्यासाठी ७५७ शिक्षक नियुक्त आहेत.
शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे पद जानेवारी २०२० पासून रिक्त आहे. सध्या एका मुख्याध्यापकाला पदोन्नती देऊन हा कार्यभार सोपविण्यात आला आहे, तर शिक्षण अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत उपआयुक्त स्वप्ना वसावे या विभागाचा कारभार पाहत आहेत. मात्र, विभागातील शाळांची व विद्यार्थ्यांची अचूक माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही शिक्षण अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने शाळांमधील शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे. याचबरोबर शहरात अनधिकृत शाळांची संख्या वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अब्दुल घनी खान यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत शिक्षण व्यवस्था कोलमडल्याचे म्हटले आहे. शिक्षकांच्या शिस्तीचा अभाव, तसेच बेकायदेशीर शाळांवर कारवाई न होणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
भिवंडीतील शिक्षण व्यवस्थेची आकडेवारी
घटक संख्या
एकूण शाळा ३१२
महापालिका शाळा १०७
प्राथमिक शाळा. ९६
माध्यमिक शाळा ११
अनुदानित शाळा. ६१
विनाअनुदानित शाळा २१
इंग्रजी माध्यम शाळा १२४
एकूण विद्यार्थी १.५२ लाखाहून अधिक
शिक्षक संख्या ३,८३४
प्राथमिक शाळांतील विद्यार्थी २५,२३२
प्राथमिक शिक्षक ७५७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.