मुरबाड, ता. १६ (बातमीदार) : कल्याण-मुरबाड रस्त्यावर काळ्या-पिवळ्या जीपच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना तातडीने प्रत्येकी २५ लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात खासदार म्हात्रे यांनी बुधवारी (ता. १५) मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ही मागणी केली.
भीषण अपघातात एकूण ११ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांपैकी सात ते आठ व्यक्ती या कुटुंबातील कमावत्या सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपजीविकेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने पुढे येऊन मृतांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांना योग्य व तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही खासदारांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने नोकरी देण्याची मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.