अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : अंबरनाथ शहर डिजिटल शिक्षणाच्या दिशेने ठोस पावले टाकत असून ‘कॉम्प्युटर शिक्षा अभियान’ संस्थेतर्फे शहरातील तीन शाळांना एकूण ३० संगणकांचे वितरण करण्यात आले. या संगणकांचे उद्घाटन बुधवारी नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
दिल्लीस्थित ‘कॉम्प्युटर शिक्षा अभियान’ संस्थेने माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या माध्यमातून अंबरनाथमधील गरजू शाळांना संगणक उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या योजनेनुसार संगणक मिळविण्यासाठी संबंधित शाळांतील शिक्षकांना मोफत प्रशिक्षण देणे बंधनकारक केले होते. या अटीला प्रतिसाद देत एम. एम. स्कूल, मॅसाइया स्कूल आणि श्रद्धा स्कूल या तीन शाळांनी पुढाकार घेतला. प्रत्येक शाळेतून दोन शिक्षकांना दहा दिवसांच्या संगणक प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शाळेला दहा याप्रमाणे एकूण ३० संगणक उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमाला नगरसेविका रचना पाटील, हर्षदा पाटील, नगरसेवक किरण राठोड, तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संस्थेचे तसेच लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
केवळ तीन शाळांचा प्रतिसाद
नगरसेवक उमेश पाटील यांनी शहरातील अनेक शाळांना या योजनेची माहिती दिली होती. मात्र, या तीन शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. हा उपक्रम ‘कॉम्प्युटर शिक्षा अभियान’ संस्था, सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील आणि नगरसेविका दर्शना पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकार झाला आहे. या योजनेपासून वंचित राहिलेल्या इतर शाळांनीही पुढाकार घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन उमेश पाटील यांनी केले.
अंबरनाथ : शहरातील तीन शाळांनी संगणक देण्यात आले. त्याचे उद्घाटन नगराध्यक्षांनी केले.