तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. या वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या भावात काहीशी घसरण झाली आहे. त्यामुळे आंबा खवय्यांना आता हापूसचा आस्वाद घेणे सुलभ होणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या अक्षय तृतीयेसाठी बाजारात आंब्याची आवक वाढली आहे.
यंदा बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन सुमारे ८० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बाजारात हापूसची आवक अत्यल्प होती. त्यामुळे दर चढे राहिल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आंबा परवडत नव्हता. एप्रिल-मे हा हापूसचा मुख्य हंगाम मानला जातो. या कालावधीत उत्पादन आणि आवक वाढल्याने भाव नियंत्रणात येतात. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपर्यंतही आवक कमीच होती. बाजारात दररोज केवळ आठ ते दहा हजार पेट्यांची आवक होत होती. १० एप्रिलनंतर आवक वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आता आवकेत हळूहळू वाढ होत आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची एकूण आवक कमीच असली तरी सध्या वाढलेली आवक आणि घसरलेला भाव यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे. आगामी काळात आवक वाढत गेल्यास दर आणखी नियंत्रणात येतील, असा विश्वास व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
आतापर्यंतची सर्वाधिक आवक
वाशी बाजारात गुरुवारी (ता. १६) हापूस आंब्याच्या सुमारे ८० हजार पेट्यांची आवक झाली, जी यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली आहे. त्यामध्ये कोकणातील ५० हजार पेट्या, तर इतर राज्यातील हापूसच्या ३० हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत आवक आणखी वाढेल, असा विश्वास फळ बाजार व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केला आहे.
भावात मोठी घट
आवक वाढल्याने घाऊक बाजारातील भावातही घट झाली आहे. यापूर्वी दोन ते पाच डझन कच्च्या आंब्याच्या पेट्यांचे भाव दोन हजार ते पाच हजार रुपयांदरम्यान होते. सध्या हे भाव दीड हजार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पिकलेल्या आंब्यांचे भाव यापेक्षा अधिक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.