प्रभाग समिती सभापतिपदाच्या मानकरीची प्रतीक्षा
वसई-विरार शहरात राजकीय खलबते सुरू
वसई, ता. १६ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट होती, त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. सत्ताधारी पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडीने बाजी मारली, तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप विरोधी बाकावर बसले आहेत. महापौर, उपमहापौरदेखील निवडले गेले. मात्र, अद्याप प्रभाग समिती सभापतीबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे या पदाचा मानकरी कोण, याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वसई-विरार महापालिकेवर ११५ सदस्य निवडून गेले आहेत, यात बहुजन विकास आघाडीचे ७१, तर महायुतीचे ४४ नगरसेवक आहेत. महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांची निवड झाली तर विरोधी पक्षनेता मनोज पाटील यांना भाजपने संधी दिली. त्यानंतर बहुजन विकास आघाडीने स्थायी समिती सभापतीचा बहुमान हा प्रवीण शेट्टी यांना दिला. मात्र, अद्याप प्रभाग समिती सभापती निवड प्रक्रिया झाली नाही. प्रत्येक प्रभाग समितीत आपला नंबर सभापती म्हणून लागावा, यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. श्रेष्ठीच्या भेटीगाठी घेणे, कामाचा तपशील देणे, नागरिकांच्या समस्याची उकल करण्यासाठी धावपळ व लोकप्रतिनिधींना जवळ करणे, असा प्रयत्नदेखील काही ठिकाणी सुरू आहे.
नागरिकांशी निगडित आरोग्य, स्वच्छता, विकासकामे, नव्या योजना, रस्ते, पाणी यावर निर्णय, आढावा घेऊन त्याबाबत योग्य त्या उपायोजना करता याव्यात यासाठी प्रभाग समिती विचार करत असते व पुढे प्रशासन व महासभेत त्याबाबत पाठपुरावा करून कामे मार्गी लावली जात असतात. मात्र, अद्यापही सभापती निवडीबाबत घोषणा झाली नाही. त्यामुळे प्रभागातील सभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
------------
परिवहन सभापती कोण?
महापालिकेची परिवहन सेवा आहे. शहरातील नागरिकांना त्यामुळे कमी दरात बसने प्रवास करण्याची सुविधा मिळते. यापूर्वी सभापती म्हणून भरत गुप्ता, प्रितेश पाटील यांची निवड झाली होती. मात्र, या वेळी परिवहन सभापतिपदासाठी अनेक इच्छुक असून, सदस्य होण्यासाठीदेखील पक्षश्रेष्ठींकडे रांगा लागत आहेत, असे सूत्रांकडून समजते. त्यामुळे परिवहन समितीवर कोणाची निवड केली जाणार, याची उत्सुकता राजकीय मंडळींना लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.