नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : सीबीडी बेलापूर येथील सिडकोच्या मुख्य कार्यालयातून भूखंडाशी संबंधित असलेली एक महत्त्वाची फाइल १२ मार्च २००८ ते जून २०१८ या दरम्यान चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्रिस्तरीय समितीच्या माध्यमातून शोध घेतल्यानंतरदेखील ही फाइल न सापडल्याने राज्य माहिती आयोगाच्या आदेशानंतर सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे खैरणेपाडा, कोपरीगाव येथील सेक्टर २६/अ मधील भूखंड क्र. १७० (क्षेत्रफळ १९९.९९ चौ. मी.) संबंधित संचिका क्र. के/६६ ही सिडकोच्या वसाहत विभागातून गहाळ झाली आहे. या भूखंडाबाबत अरुण काशिनाथ मुंबईकर यांनी माहितीच्या अधिकारात २०१६ मध्ये सिडको कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, सिडको प्रशासनाला ही संचिका सापडली नाही. हे प्रकरण पुढे राज्य माहिती आयुक्त, कोकण खंडपीठापर्यंत पोहोचले. खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्रिस्तरीय समिती नेमून फाइल शोधण्याचे आदेश दिले होते. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही फाइल न सापडल्याने राज्य माहिती आयुक्त, कोकण खंडपीठ यांनी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या सुनावणीत ६० दिवसांच्या आत गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सिडकोचे क्षेत्र अधिकारी सचिन रामचंद्र कडू यांनी सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.