मुलांच्या भवितव्यासाठी धडपड
वसईत आरटीई प्रवेशासाठी पालकांच्या रांगा
विरार, ता. १७ (बातमीदार) ः वसई-विरार शहरात आरटीई प्रवेशासाठी पहिली फेरी सुरू आहे. चुळणे येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठीच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे; मात्र टोकन मिळत नसल्यामुळे केंद्राबाहेर पालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
वसई तालुक्यात आरटीई प्रवेशासाठी १५० शाळांनी नोंदणी केली असून चार हजार ५६ जागांचा समावेश आहे. या शाळांमध्ये आरक्षित २५ टक्के जागांसाठी २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी चार हजार ५६ जागांसाठी तालुक्यातून तीन हजार ६१५ अर्ज आले आहेत. १० एप्रिलला जाहीर झालेल्या पहिल्या यादीत दोन हजार १७७ विद्यार्थ्यांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर एक हजार ५८ विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत. या अर्जांची पडताळणी चुळणे येथील जिल्हा परिषद शाळेत केली जात आहे. यासाठी दिवसाला २०० टोकनचे वाटप केले जाते; मात्र कागदपत्र पडताळणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
-------------------------------------
पडताळणी प्रक्रियेवरून वाद
चुळणे येथे अधिकाऱ्यांनी २०० जणांना टोकन दिले होते; मात्र त्यानंतर लोकांना टोकन दिले नाही. सोमवारी आलेल्या पालकांनी मिळून एक यादी तयार केली होती; पण ती यादीही फाडून टाकली. त्यामुळे पुन्हा फेऱ्या माराव्या लागत आहेत. तसेच दोन हजारपेक्षा जास्त अर्ज असताना फक्त एकच केंद्र असल्याने पालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अर्ज पडताळणी प्रक्रिया वादात सापडली आहे.
================================
अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका
पालघर जिल्ह्यातील आरटीईअंतर्गत आरक्षित जागांपैकी सर्वाधिक जागा वसई तालुक्यातील आहेत; मात्र बोर्डाच्या परीक्षा, त्यानंतर पेपर तपासणी तसेच शाळांचे सुरू असणारे मूल्यांकन अशा विविध कामांचा भार शिक्षकांवर आहे. यामुळे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कामाचा ताण वाढला आहे.
===============================
आरटीई प्रवेशासाठी ८०० पेक्षा जास्त टोकन पालकांना दिले आहेत. तर ३५० अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. २० एप्रिल जरी शेवटची तारीख असली तरी प्रशासनाकडून मुदत वाढवण्यात येते, असा अनुभव आहे. त्यामुळे पालकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही.
- शैला रॉड्रिग्ज, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, वसई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.