शैक्षणिक मदतीसाठी ‘हृदयलताशा’चे आयोजन
कल्याण (वार्ताहर) : गरीब परंतु हुशार मुलांना शैक्षणिक मदत करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या स्पंदन संस्थेच्या निधी उभारणीसाठी मंगेशकर कुटुंबीयांच्या गाण्यांवर आधारित ‘हृदयलताशा’ हा कार्यक्रम रविवारी (ता. २६) रात्री ८.४५ वाजता कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. गेली १८ वर्षे स्पंदनतर्फे गरीब पण हुशार अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात मदत केली जाते. संस्थेने आजवर जवळजवळ ३५० मुलांना मदत केली आहे. तसेच आदिवासी पाड्यावरील काही शाळांना वस्तू स्वरूपातदेखील मदत केली आहे. याच उपक्रमातील भाग म्हणून निधी उभारणीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन हे देणगीदार तसेच गरजू विद्यार्थी यापर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम आहे, असे संस्थेचे एक सदस्य प्रशांत दांडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती तबलावादक अमेय ठाकुरदेसाई यांची असून, या कार्यक्रमात ऋषिकेश रानडे, शरयू दाते, मधुरा दातार हे प्रतिथयश गायक तसेच अनेक नामवंत वादक सहभागी होणार आहेत.