स्वामी पुण्यतिथीनिमित्त सामूहिक पारायण
कल्याण (वार्ताहर) : श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त कल्याण-डोंबिवली शहर परिसरातील केंद्रात आठदिवसीय सामूहिक पारायण, तारक मंत्राचे पठण करण्यात आले. कल्याण पारनाका येथील सेवा केंद्रात या सामूहिक पारायणची सांगता करण्यात आली. स्वामी महाराजांनी चैत्र वैद्य त्रयोदशीला समाधी घेतल्याने हा दिवस स्वामींचा स्मरण दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. कल्याण-डोंबिवली शहर परिसरातील स्वामींच्या केंद्रात श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करण्यात आला. २० टक्के अध्यात्म व ८० टक्के समाजकार्य या दिंडोरी प्रणित मार्गाच्या उक्तीनुसार पारनाका सेवा केंद्र येथे आध्यात्मिक सेवांबरोबरच सामाजिक उपक्रमदेखील घेण्यात आले. वर्षभरामध्ये या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे, भव्य रक्तदान शिबिरे, योग शिबिरे, विद्यार्थ्यांना वह्यावाटप, आदिवासी पाड्यांवर व कुष्ठरोग वसाहतीत अन्नदान व वस्त्रदान असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती सेवेकरी स्वाती पाचघरे व संज्योत पाचघरे यांनी दिली.