खेळणी तुटली, दिवे गुल
खारघरमधील उद्यानांची दुरवस्था; मुलांच्या आनंदावर विर्जण
खारघर, ता. १७ (बातमीदार) : खारघर सेक्टर चारमधील उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून पाहून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लहान मुलांसाठी विरंगुळा आणि खेळाची सुरक्षित जागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उद्यानात सध्या मोडकळीस आलेली खेळणी, गायब झालेली हिरवळ आणि जागोजागी पडून असलेले दगड यामुळे मुलांना खेळणे धोकादायक बनले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्याने सकाळ-संध्याकाळ मोठ्या संख्येने मुले उद्यानात खेळण्यासाठी येतात. मात्र, सेक्टर चार येथील २२/२३ मधील भूखंडावर उभारलेल्या उद्यानातील घसरगुंडी, झोपाळे यांसारखी खेळणी तुटलेली आहेत, तर काही खेळण्यांचे लोखंडी भाग बाहेर आले असून, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याशिवाय, उद्यानातील गवत आणि हिरवळ जवळपास पूर्णपणे नाहीशी झाली असून मोठ्या प्रमाणात दगड बाहेर आली आहेत. यामुळे खेळताना मुलांचा तोल गेल्यास दुखापतीची शक्यता पालकांनी व्यक्त केली.
दिवे बंद असल्याने अंधार
सेक्टर सातमधील भूखंड क्रमांक १२ मधील उद्यानाच्या मध्यभागी असलेल्या हायमास्टवरील काही दिवे बंद असल्याने सातनंतर अंधार पसरतो, तर काही खेळणी मोडकळीस आली आहेत. तसेच, सेक्टर चार भूखंड क्रमांक सहा उद्यानातील बाकडे मोडकळीस आले असून, काही झाडे सुकून गेली आहेत. तसेच उद्यानात स्वच्छता केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
माझ्या प्रभागातील काही उद्याने चांगली आहेत. मात्र, काही उद्यानांची दुरवस्था झाली आहे. सेक्टर चारमधील उद्यानात गर्दुल्यांचा वावर असतो. खेळणी मोडकळीस आली आहेत. काही उद्यानात सुरक्षा रक्षक आणि माळी कामगार असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात कोणी उपस्थित नसते. तरीही सर्वांना पगार वेळेत मिळतो. यासंदर्भात येणाऱ्या महासभेत प्रश्न उपस्थित करणार आहे.
- लीना गरड, स्थानिक नगरसेविका
सेक्टर चार भूखंड क्रमांक २२/२३ मधील भूखंडावर उद्यान सिडकोने पालिकेकडे हस्तांतरण झाले नाही. तसेच, सेक्टर पाच आणि सहामधील बंद पथदिवे सुरू करण्यात यावे, अशी सूचना विद्युत विभागाला केली आहे.
- नानासाहेब कामठे, उपायुक्त पनवेल महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.