पेण उपजिल्हा रुग्णालयात २२ शौचालयांसाठी एकच कर्मचारी
स्वच्छता रामभरोसे
पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेण उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शौचालयांची साफसफाई सध्या रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रुग्णालयात एकूण २२ शौचालयांची साफसफाई केवळ एका कर्मचाऱ्याकडून करून घेतली जात होती. त्यालाही केवळ सहा हजार रुपये मानधन दिले जात असल्याने अखेर त्याने काम सोडल्याची घटना समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी तसेच मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या या उपजिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. गरीब व आदिवासी समाजासाठी हे रुग्णालय महत्त्वाचे असून, येथे उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याने अनेक रुग्ण येथेच उपचार घेतात. डॉक्टर, औषधे व अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्या तरी स्वच्छतेच्या समस्येमुळे रुग्ण व नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे.
न्यू ज्वाला फोर्स या ठेकेदारामार्फत प्रकाश चव्हाण हा एकमेव कर्मचारी सर्व शौचालयांची स्वच्छता करत होता. मात्र, कमी वेतन आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे त्याने १ एप्रिलपासून काम बंद केले आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून शौचालयांची स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट
अपुऱ्या मनुष्यबळामुळे स्वच्छतेवर परिणाम
रुग्णालयात आवश्यक त्या प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यास आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन अतिरिक्त कर्मचारी नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोट
पेण उपजिल्हा रुग्णालयात मी गेली अनेक वर्षे ठेका पद्धतीने शौचालय साफसफाईचे काम करत होतो. मात्र, लिपिक गंधे यांनी मागील काही महिन्यांपासून हे काम दिवसातून दोनदा करण्याचा तगादा लावला. ६,००० रुपयांत हे काम करणे शक्य नसल्याचे मी वारंवार सांगूनही त्यांनी दबाव टाकला, त्यामुळे मला काम सोडावे लागले. तसेच माझे एक-दोन महिन्यांचे वेतन बाकी असून, ते मिळवण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर मला प्रवेश नाकारला जात आहे. या परिस्थितीमुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
-प्रकाश चव्हाण, कर्मचारी
कोट
उपजिल्हा रुग्णालयामधील साफसफाई दररोज केली जात असून, न्यू ज्वाला फोर्स या ठेक्याच्या माध्यमातून शौचालयाची साफसफाई करणारा कंत्राटी कामगार यांनी सदरचे काम सोडले आहे. याबाबत ठेकेदार यांना कल्पना दिली आहे. मात्र, स्वतः संबंधित ठेकेदार किंवा त्यांचा सब ठेकेदार हे कोणीही इथे येत नाहीत.
डॉ. संध्या राजपूत, वैद्यकीय अधिकारी, पेण उपजिल्हा रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.