फेरीवाल्यांवर केडीएमसीची मोठी कारवाई
उर्सेकरवाडी भाजी मंडईतील ११४ गाळे सील
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील उर्सेकरवाडी भाजी मंडईत अनधिकृत वापरावर कल्याण-डोंबिवली महापालिकेने बुधवारी (ता. १५) सायंकाळी मोठी कारवाई करत तब्बल ११४ गाळे सील केले. फेरीवाल्यांनी या गाळ्यांचे गोदाम व दुकाने म्हणून रूपांतर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत ही कारवाई केली.
‘ग’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि ‘फ’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ता कर विभागाने संयुक्त मोहीम राबवली. उर्सेकरवाडी भाजी मंडईतील अनेक ओटे मूळतः भाजीपाला विक्रीसाठी देण्यात आले होते. मात्र, फेरीवाल्यांनी हे ओटे भाड्याने घेऊन त्यावर शटर बसवून साठवणूक व विक्रीसाठी वापर सुरू केला होता. याशिवाय येथूनच माल घेऊन रेल्वे स्थानक परिसर, पदपथ आणि गल्ल्यांमध्ये बेकायदा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या बैठकीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कारवाईदरम्यान संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
-----------------
कारवाईला विरोध
कारवाईला काही फेरीवाले आणि गाळेधारकांनी विरोध दर्शवला. त्यांचा विरोध न जुमानता नियमभंगावर कठोर भूमिका घेत गाळे सील करण्याची कारवाई पूर्ण केली.
महापालिकेच्या मालकीच्या जागेचा नियमबाह्य वापर होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील टप्प्यात संबंधित करारनाम्यांची चौकशी केली जाणार आहे. अनधिकृत भाडे व्यवहार आणि नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधितांवर अधिक कडक कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.