भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : सध्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संस्था व शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना गणवेश पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करतात. या विरोधात भिवंडी शहरातील सर्व माध्यमातील शाळांच्या व्यवस्थापनाला पत्राद्वारे शासन निर्णयाद्वारे सक्ती न करण्याबाबत कळविण्यात आले आहे. कोणत्याही शाळेने सक्ती केल्यास व त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शाळांविरोधात शासन निर्णयानुसार कारवाई करण्याचा इशारा भिवंडी पालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सौदागर शिखरे यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांसाठी गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत शासन निर्णयाचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार भिवंडी महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांकडून गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. तसेच राज्य मंडळ, सीबीएसई व आयसीएसई मंडळांच्या शाळांनी एनसीईआरटी व एससीईआरटी (बालभारती) पाठ्यपुस्तके वापरावीत, अन्य मंडळांच्या शाळांनी संबंधित मंडळांनी प्रमाणित केलेली पाठ्यपुस्तके वापरावीत, कोणत्याही शाळेने विशिष्ट खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा वापर करण्याचे बंधन अथवा सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये असे कळविण्यात आले आहे. या बाबत शिक्षण विभागाकडून तपासणी करण्यात येईल. पालकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास त्याची खातरजमा करून सक्ती केल्याचे आढळून आल्यास शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिखरे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.