ड्रग्ज तस्करावर नवी मुंबई पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक
चार वर्षांत १३६ कोटींचा मुद्देमाल जप्त; १,९९३ गुन्हे दाखल
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ ः अमली पदार्थांच्या विळख्यातून शहराला वाचवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मागील चार वर्षांपासून शहरात विशेष मोहिमा राबवल्या आहेत. नशामुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली विविध कारवायांमध्ये तब्बल १३६ कोटी तीन लाख ७९ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. तसेच अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये एकूण एक हजार ९९३ गुन्हे दाखल करून या दोन हजार ३९६ आरोपींना जेरबंद केले आहे.
शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आणि अमली पदार्थविक्रीत गुंतलेल्या आफ्रिकन नागरिकांवर पोलिसांनी ऑपरेशन गरुड १ व आणि ऑपरेशन आफ्रिकन किचनअंतर्गत छापे टाकले. या कारवायांमध्ये कोट्यवधींचे कोकेन, मेफेड्रॉन (एमडी)आणि ट्रॅमेडॉल टॅबलेट्स जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, पासपोर्ट आणि व्हिसा संपल्यानंतरही शहरात राहणाऱ्या ९११ विदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. यामुळे तस्करांचे धाबे दणाणले.
आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय टोळ्या जेरबंद
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या तांत्रिक तपासामुळे थायलंडमधून भारतात हायड्रो गांजाची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त झाले. थायलंडमध्ये बसून हायड्रो गांजाचे रॅकेट चालवणाऱ्या नवीन आणि धीरज चिंचकरसारख्या मुख्य सूत्रधारांना मलेशियातून अटक करणे शक्य झाले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील दोन पोलिस अंमलदारांना थेट सेवेतून बडतर्फ केले आहे. याशिवाय कस्टम्स विभागाचा एक अधिकारी आणि मुंबई-दिल्ली पोस्ट ऑफिसमधील दोन कर्मचाऱ्यांसह २६ जणांना अटक करण्यात आली.
पंजाब हेरॉईन, अफिम, आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त
अमली पदार्थविरोधी पथकाने पंजाबमधून नवी मुंबईत येऊन हेरॉईन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाच कोटी ३२ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पंजाब हेरॉईन रॅकेट प्रकरणात एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये एकूण ५६ आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी ४४ आरोपींना नवी मुंबई, मुंबई, अमृतसर, पुणे, चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे.
मोक्का कारवाई
अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रबाळे परिसरातील शांताबाई करंडेकर आणि तिच्या टोळीवर थेट मोक्काअंतर्गत कारवाई करून अमली पदार्थांचा स्थानिक व्यापार मोडीत काढला आहे. या सर्व कारवायांमध्ये अमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे आणि त्यांच्या विशेष पथकाने विशेष कामगिरी केली आहे. ऑपरेशन प्रहारअंतर्गत ४८ ठिकाणी छापे टाकून त्यांनी अमली पदार्थाच्या तस्करांचे जाळे नष्ट केले आहे.
नवी मुंबईला पूर्णपणे ड्रग्जमुक्त करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही केवळ स्थानिक तस्करावरच नाही, तर आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय पुरवठा साखळीवर प्रहार करत आहोत. तरुण पिढीला नशेच्या गर्तेतून वाचवण्यासाठी आमचे झीरो टॉलरन्स धोरण कायम राहील. नवी मुंबईत अमली पदार्थांना थारा नाही, आमची कारवाई केवळ अमली पदार्थ जप्त करण्यापुरते मर्यादित नाही. या काळ्या व्यवसायाला मदत करणाऱ्या, मग तो अधिकारी असो वा परदेशी नागरिक, कोणालाही सोडले जाणार नाही, १५०० हून अधिक विदेशी नागरिकांची हद्दपारी आणि दोषी कर्मचाऱ्यांची बडतर्फी हे आमचे स्पष्ट संकेत आहेत.
- मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई
मागील चार वर्षांत अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाया
२०२३ : २९० गुन्हे - ३५३ अटक - २१ कोटींचे अमली पदार्थ जप्त
२०२४ : ४८४ गुन्हे - ६०९ अटक - ३० कोटींचे अमली पदार्थ जप्त
२०२५ : ९९० गुन्हे - १,१५६ अटक - ६७ कोटी ४८ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मार्च २०२६पर्यंत : २२९ गुन्हे - २७८ अटक - १७ कोटी २७ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.