काळू-शाईसाठी संयुक्त बैठक
वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काळू व शाई धरण उभारण्यातील अडथळे दूर करण्यात येणार आहेत. त्यासाठी मंत्रालयात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे वनमंत्री व ठाण्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी येथे दिले.
जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांची भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी भेट घेतली. या वेळी काळू व शाई या धरणांसाठी पुढाकार घेण्यासाठी त्यांनी निवेदन दिले. तसेच त्यांचे ठाणे शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधले. ठाणे महापालिकेला स्वतंत्र धरण असावे, यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या बैठकीला स्थानिक आमदार व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. महापालिकेसाठी स्वतंत्र धरणाची चर्चा २००२ पासून सुरू आहे. मात्र काळू व शाई ही दोन्ही धरणे विविध मुद्द्यांवरून रखडली. दोन्ही धरणांचे भूसंपादन पूर्ण झाले नसून, ग्रामस्थांकडून विरोधही केला जात आहे.
एकरकमी मोबदला
यापूर्वी बारवी धरणाची उंची वाढविण्याच्या प्रश्नावेळी संबंधित प्रकल्पग्रस्तांना महानगरपालिका, नगरपालिका व तत्सम प्राधिकरणात नोकरी किंवा एकरकमी मोबदला असे पॅकेज देण्यात आले. त्याला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प मार्गी लागला. त्याच धर्तीवर काळू व शाई प्रकल्पग्रस्तांना ठाण्यात ४०० ते ५०० चौरस फुटांची सदनिका किंवा एकरकमी पॅकेज असा पर्याय ठेवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.