‘समाजविज्ञान’साठी ‘टिस्स’ची मार्गदर्शक तत्त्वे!
देशभरातील शिक्षण मंडळे, शिक्षणतज्ज्ञांसोबत होणार चर्चा
मुंबई, ता. १८ : देशभरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळांसोबत एनसीईआरटी आणि विविध राज्यांतील शिक्षण मंडळांना त्यांच्या अभ्यासक्रमात समाजविज्ञान या विषयाचे पुस्तक तयार करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टिस्स) मार्गदर्शक तत्त्वे तयार करून देणार आहे. यासाठी ‘टिस्स’कडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती टिस्सचे कुलगुरू प्रो. बद्रीनारायण तिवारी यांनी शनिवारी (ता. १८) दिली.
टिस्सच्या मुंबई संकुलात आज झालेल्या ८५व्या दीक्षान्त सोहळ्यानंतर प्रो. तिवारी यांनी यासाठीची माहिती देताना देशभरातील शिक्षण मंडळांसाठी समाजविज्ञान या विषयावरील पुस्तकाला लागणारी मार्गदर्शक तत्त्वे आपण तयार करीत असल्याचे सांगितले. देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर भारतीय ज्ञानपरंपरा या विषयाला खूप महत्त्व आले आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरातील विविध समाजघटक, त्यांच्या लोकपरंपरा, त्यांचे सण, उत्सव, त्यांच्या रूढी-परंपरा, त्यांचे आदर्श आदींचे प्रतिबिंब लक्षात घेऊन समाजविज्ञानच्या पुस्तकात त्याचे चित्र कसे असेल यासाठी मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची ठरतील. यात विविध समाज घटक, समूहांची ओळख विद्यार्थ्यांना सहजपणे होण्यास मदत होईल यासाठीचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.
--
विचारमंथनासाठी पुढाकार
समाजविज्ञान पुस्तकासाठी लवकरच एनसीईआरटी, सीबीएसई, विविध राज्यांतील राज्य शिक्षण मंडळांचे प्रतिनिधी, विविध राज्यांतील शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, विचारवंत यांच्यासोबत संवाद साधला जाणार आहे. या मार्गदर्शक तत्त्वांसाठी टिस्सकडून अनेक ठिकाणी चर्चासत्रांचेही आयोजन केले जाणार असल्याचे कुलगुरू प्रो. बद्रीनाथ तिवारी यांनी सांगितले.
--
वादग्रस्त मुद्दे टाळण्याचा प्रयत्न
भारतीय समाज आणि त्याचे एकूणच चित्र शालेय विद्यार्थ्यांना सहज लक्षात यावे, त्यात कुठेही वाद निर्माण हाेऊ नये अथवा इतर घटकांवरील अन्याय टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची असतील. अभ्यासक्रमामुळे निर्माण हाेणारे वाद टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या राज्यातील सामाजिक, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ही तत्त्वे तयार केली जाणार असल्याचे कुलगुरू प्रो. तिवारी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.